संदीप गायकवाड : विरार | राजोडीच्या समुद्रकिनारी असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये थाटलेल्या बोगस कॉल सेंटरवर अर्नाळा पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटर चालविणाऱ्या,व त्यांना मदत करणाऱ्या जागा मालक अश्या तब्बल 51 जणांवर गुन्हा दाखल करून 11 तरुणी व 39 तरुणांना अटक केली असून यातील मुख्य सूत्रधार नवीन भूपेंद्रकुमार भूताने हा अद्यापही फरार आहे.
हे सर्व जन महाराष्ट्रात राहणारी नसून दिल्ली, पंजाब, हरियाणा उत्तर प्रदेश राज्यातील राहणारी असून उच्च शिक्षित आहेत.ऑस्ट्रेलियातील पे पाल बँकेच्या खातेदारकांना इंटरनेट कॉलच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातील पैसे लूटण्याचे काम या बोगस कॉल सेंटरमधून केले जात होते. हे कॉल सेंटर मागील दीड महिन्यापासून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
वसईच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक रिसॉर्ट आहेत. अश्यातच राजोडी येथील OAC पेंट बुल अरेना रिसॉर्टमध्ये एक बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाली होती. शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी या रिसॉर्टवर छापा मारला. यावेळी बोगस कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळले. रविवार दिवसभर ही कारवाई सुरू होती. ऑस्ट्रेलियाच्या पे पाल या बँकेच्या ग्राहकांचे परस्पर वळवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती. अटक आरोपींकडून 16 लाखांचा मुद्देमाल असे 59 कॉम्प्युटर जप्त करण्यात आले असून पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.