लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत म्हणाले की, विजय तर मिळवायचा आहे पण एवढ्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देणाऱ्यांचे उपकार पुन्हा एकदा जनसेवेच्या माध्यमातून मला फेडायचे आहेत. याचं भान मी मनामध्ये ठेवून वागतो आहे. रत्नागिरीमध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा होईल. ते विजयाचा पहिला पुकार त्या रत्नागिरीच्या सभेतून करतील. 3 मेला कणकवलीच्या सभेमध्ये ते माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करतील.
आज मुंबई गुजरातला जोडण्याचे कपट कारस्थान चाललं असताना मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करण्याचे कपट कारस्थान चाललं असताना या गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबाण संपवण्याचे कपट कारस्थान चाललं असताना. अशा या कपटी लोकांची साथ देण्यासाठी मनसे जर पुढे येत असेल तर लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.
तसेच विनायक राऊत पुढे म्हणाले की, विनायक राऊत हा मंत्रीपदासाठी हापापलेला नाही. विनायक राऊत सत्तेसाठी लाचार झालेला माणूस नाही आहे. माझी निष्ठा आणि माझी श्रद्धा माझ्या पक्ष नेतृत्वाबरोबर आणि माझ्या मतदारसंघातील मतदारांची ही माझ्यासाठी खूप मोठी आहे. मंत्री म्हणून काय दिवे लावले? जे 35 वर्षात तुम्ही काही केलं नाही. ते आता काय करणार आहात. या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं गद्दारांचं सरकार पूर्णपणे बरखास्त होईल आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल. असं विनायक राऊत म्हणाले.