Vijay Wadettiwar Tweet : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून महाविकास आघाडीचे नेते सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. "महायुतीतील तीनही पक्षांना निवडणुकीपूर्वी स्वतःचा प्रचार करण्यासाठी आवश्यक असलेला निधी , योजनेच्या प्रचार प्रसाराच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून काढून घेतला आहे", असं ट्वीट करत वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार ट्वीटरवर काय म्हणाले?
महायुती सरकारने केलेल्या लोकप्रिय घोषणा या लाडक्या बहिणीसाठी किंवा भावासाठी नाही तर लाडक्या खुर्चीसाठी आहे. महायुतीतील तीनही पक्षांना निवडणुकीपूर्वी स्वतःचा प्रचार करण्यासाठी आवश्यक असलेला निधी, योजनेच्या प्रचार प्रसाराच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून काढून घेतला आहे आणि हा निधी म्हणजे एक - दोन कोटी नसून तब्बल २७० कोटी रुपयांचा हात सरकारी तिजोरीवर महायुतीने मारला आहे.
कल्याणकारी सरकारचे कर्तव्य असते , जनतेसाठी योजना बनवणे, राबवणे...हे सरकार अनेक योजनांची घोषणा करते, पण प्रत्यक्षात जनतेला किती लाभ होतो हा आता संशोधनाचा विषय आहे. आज या जीआरने सिद्ध केले की निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा प्रचार करायला सरकारी तिजोरीवर महायुतीने डल्ला मारला आहे.