ताज्या बातम्या

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन; राज ठाकरे पोस्ट करत म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाले. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्यावर्षी त्यांना कॅन्सरती लागण झाली होती. त्यावर त्यांनी यशस्वी मात केली होती. त्यानंतर पुन्हा काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांना तब्येत बरी नसल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, आज आमचा अतुल गेला.... एक उमदा नट आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझा एक जवळचा मित्र गेला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं अतुलचं होतं. आम्ही सगळे बालमोहन शाळेचे विद्यार्थी. आम्ही शाळेत असतानाचा काळ असा होता की सिनेमाच्या जगातले राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना हे आमचे शाळेबाहेरचे हिरो पण अर्थात आमच्यापासून मैलांवरचे असलेले हिरो किंवा आम्ही त्यांचे चाहते म्हणू. पण शाळेत आम्ही ज्याचे चाहते होतो तो म्हणजे अतुल परचुरे. तो त्या काळात बजरबट्टू नावाच्या नाटकात काम करायचा . शाळेत असताना पण तो उस्फुर्त आणि उमदा नट. अतुल हा जन्मजात अभिनेता असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

शाळेत असताना त्याचा आणि माझा फारसा मैत्र नव्हता, पण आमच्या साठी तो तेव्हाच एक सेलिब्रिटी होता ! कॉलेजला गेल्यावर जरी आमची कॉलेजेस वेगळी होती तरी आमची मैत्री झाली आणि ती घट्ट पण होत गेली. अतुल हा खरा रंगकर्मी. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली अशा नाटकांमध्ये अतुलने जे काम केलं अफाट होतं. बरं अतुल इतका नशीबवान अभिनेता की, त्याचं व्यक्ती आणि वल्ली मधलं काम पु.ल. देशपांड्यांनी फक्त पाहिलं नाही तर त्याला दाद देखील दिली.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, मी जेव्हा पक्ष स्थापन केला, तेंव्हा अतुलने पक्ष सदस्यत्वाचा फॉर्म देखील भरला होता. तेंव्हाच्या राजकीय परिस्थितीत एखाद्या कलाकाराने असं पाऊल उचलणं हे धाडस होतं, पण ते त्याने दाखवलं. तो पुढे माझ्या कुटुंबाचा भाग बनला होता. कायम आनंदी, जरा जास्तच गुटगुटीत असा हा आमचा मित्र, ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो, असा अतुल जेंव्हा कर्करोगाशी झुंज देऊन बाहेर आला, आणि जेंव्हा तो खंगला होता, तेंव्हा तो आमच्या मित्रांपैकी कोणालाच बघवत नव्हता.

पण अशा अवस्थेत सुद्धा तो आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होता. मी म्हणलं तसं अतुल हा प्रतिभावान कलावंत होता आणि वृत्तीने आनंदी होता. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपट केले, टीव्ही मालिका केल्या, हिंदीत पण त्याने अनेक टीव्ही शो केले पण अतुल हा खरा रंगकर्मी. त्याचा रंगमंचावरचा वावर, त्याच्या विनोदाच्या टाईमिंगचा असलेला सेन्स सगळंच अप्रतिम होतं. अभिनयावर कमालीचं प्रेम असलेल्या अतुलने अकाली 'एक्झिट' घेतली, पण जाताना रंगभूमीपासून, सर्व मित्रांच्या आयुष्यातलं काही तरी निखळलं ही भावना ठेवून गेला. आमच्या या मित्राला माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली. असे राज ठाकरे म्हणाले.

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती अत्यवस्थ; नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु

परळीच्या वैद्यनाथ मंदिराची तोडफोड; माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

Kojagiri Purnima : कोजागरी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले...

राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची शपथविधी, 'या' आमदारांनी घेतली शपथ