पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उद्या पुण्यात सभा आहे. या सभेची जोरदार चर्चा सुरु असून, मनसेकडून (MNS) या सभेसाठी मोठी तयारी सुरु आहे. मात्र या सभेपूर्वी वसंत मोरे 20 कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार अशा वावग्या उठल्या होता. यावर स्वत: वसंत मोरेंनी आपली बाजू मांडली आहे. वसंत मोरे आणि पुणे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश माझीरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे (Vasant More) हे नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्याबद्दल वसंत मोरेंनी अनेकदा आपली खदखद व्यक्त केली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी या व्हिडिओतून पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत गटबाजीबद्दल संताप व्यक्त केला आहे.
वसंत मोरे यांनी व्हिडिओमधून निलेश माझीरे यांच्यावर पक्षातून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केला. "निलेश माझीरेबद्दल काही गोष्टी व्हायरल झाल्या, त्यानंतर लगेचच त्याच्यावर कारवाई झाली. कोर्टात जे पुरावे गृहीत धरले जात नाहीत, ते पुरावे यांच्या कोर्टात गृहीत धरले जात नाही. पक्षातील काही पार्ट टाईम कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक वंसत मोरेंची टीम संपवण्याचं काम केलं जातंय. निलेश महाजीरेंकडून पद काढून घेण्यात आलं, त्यांच्या ठिकाणी दुसऱ्याची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मी त्या लोकांना सांगू इच्छितो की, स्पर्धा करायची असेल तर पक्षाचे किती नगरसेवक येतील याची करा" असं वसंत मोरे म्हणाले.
वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे त्यांचं शहर अध्यक्षपद काढून घेतल्यानंतर ते थेट पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा बळावल्या. मात्र वसंत मोरेंनी यापूर्वी अनेकदा आपण कुठेही जाणार नसून, राज साहेबांसोबतच राहणार असल्याचं सांगितलं आहे. वसंत मोरेंची आणि राज ठाकरेंची भेट होणार असल्याच्या देखील शक्यता राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यादरम्यान व्यक्त केल्या जात होत्या. मात्र नंतर ही भेट झाली नाही.