वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्यातून बाहेर जात असल्याची माहिती काल समोर आली. त्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. काही दिवसांपुर्वी सत्ता गमावलेल्या महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांकडून अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसकडून शिंदे-फडणवीस सरकारवर या गोष्टीचं खापर फोडलं जातंय तर, 'मागील वर्षभरात सरकारकडून कंपनीशी पुरेसा संवाद न झाल्यानं हे प्रोजेक्ट गुजरातला जात असल्याचं' वक्तव्य उद्योग मंत्री असलेल्या उदय सामंत यांनी केलं आहे. दरम्यान, हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं युवासेना आक्रमक झाली आहे.
युवासेनेचं आज राज्यभर आंदोलन:
युवासेना अध्यक्ष व आमदार असलेल्या आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ व युवासेनेचे सरचिटनीस वरुण सरदेसाई हे या प्रकरणावरून आक्रमक झाले असून आज युवासेनेतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचं नेतृत्त्व स्वत: वरुण सरदेसाई करणार आहेत.
काय म्हणाले वरुण सरदेसाई?
या नवीन सरकारच्या कारभारामुळे ही कंपनी आपल्याला सोडून गुजरातला गेली. सोबत 1 लाख रोजगाराची संधी देखील घेऊन गेली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज राज्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक महाविद्यालयासमोर युवासेनेच्या माध्यमातून आंंदोलन करण्यात येणार आहे.