केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी ‘भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड’ (बीईएमएल) येथे नवीन ‘वंदे भारत स्लीपर कोच’ रेल्वेगाडीचे अनावरण केले. या रेल्वेची योग्य चाचणी झाल्यानंतर तिचे उत्पादन सुरू होणार आहे.
नवीन रेल्वेचा आराखडा तयार करणे हे अतिशय क्लिष्ट काम असून त्यात सातत्याने सुधारणा करत असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. वंदे भारत चेअर, वंदे भारत स्लीपर, वंदे भारत मेट्रो आणि अमृत भारत अशा चार रेल्वे गाड्यांवर काम सुरू आहे. वंदे भारत स्लीपर कोच मध्यमवर्गीयांची आहे. तिचे भाडे राजधानी एक्स्प्रेसच्या बरोबरीचे असेल, असेही वैष्णव यांनी सांगितले. आगामी तीन महिन्यांत ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
वंदे भारत स्लीपर ट्रेनला 16 डबे असतील. ज्यामध्ये एसी 3 टायरचे 11 डबे, एसी 2 टायरचे 4 डबे आणि एसी फर्स्टचा एक डबा असेल. या ट्रेनची एकूण बर्थ क्षमता 823 प्रवासी असेल. ज्यामध्ये एसी 3 टायरमध्ये 611 प्रवासी, एसी 2 टायरमध्ये 188 प्रवासी आणि एसी 1 ला 24 प्रवासी प्रवास करू शकतात.
वंदे भारत स्लीपरमध्ये क्रॅश बफर आणि कप्लर बसवण्यात आले आहेत. वंदे भारतच्या आत धूळ शिरणार नाही आणि प्रवासादरम्यान प्रवाशांना धक्का लागणार नाही. एवढेच नाही तर त्यात मॉड्युलर टॉयलेट, मॉड्युलर पॅन्ट्री, डिस्प्ले पॅनल आणि सुरक्षा कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. फर्स्ट क्लास एसीमध्ये गरम पाण्याचा शॉवरही बसवण्यात आला आहे.