निसार शेख, रत्नागिरी
बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलनाबद्दल मोठी बातमी आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना काल राजापूरमध्ये अटक झाली त्यांच्यासोबत अन्य दोन सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या तिघांनाही सध्या रत्नागिरीत ठेवण्यात आलं आहे.
कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज दिल्यानंतर देखील स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. दरम्यान काल काही नागरिकांना घरी पाठवण्यात आलं मात्र ज्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे, ती जागा मात्र आंदोकांनी सोडली नाही. काहींना घरी पाठवल्यानंतर आंदोलकांच्या एका गटाने आंदोलनस्थळी रात्रभर पहारा दिला.
काल (24 एप्रिल) राजापूर तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान पोलिसांनी जवळपास दोन हजारांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे