Trump vs kamla harris 
ताज्या बातम्या

USA Elections: अमेरिकेत आज मतदान, ट्रम्प हॅरीस यांच्यात चुरस

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या मैदानात डोनाल्ड ट्रम्प यांची लढत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्याबरोबर आहे.

Published by : Team Lokshahi

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार तसेच विद्यामान उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील ही लढत अत्यंत अटीतटीची झाली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधलं आहे.

अत्यंत विखारी प्रचारानंतर होत असलेल्या या निवडणुकीत अमेरिकेचा 47 वा अध्यक्ष कोण होणार, हे निश्चित होणार आहे. मतदानाची उलटगणती सुरू असताना ट्रम्प यांनी '2020 मध्ये मी व्हाइट हाऊस सोडायलाच नको होते. आम्ही खूप चांगले प्रयत्न केले होते', असे विधान केले आहे. 2020 मधील निवडणुकीनंतर जो बायडेन अध्यक्ष झाले. ट्रम्प यांनी मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आणि न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच 'कॅपिटॉल हिल' इमारतीबाहेर ट्रम्प समर्थकांनी दंगल घडविली होती. हॅरिस यांनी ट्रम्प यांच्याविरोधात टीकेची राळ उडवली आहे. मिशिगन येथे प्रचाराचा शेवट करताना त्यांनी 'सर्व अमेरिकी नागरिकांची मी अध्यक्ष असेन', असे विधान केले. 'द्वेष आणि विभाजन' यावर अमेरिकींनी आता व्यक्त होण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या अवघ्या एक आठवड्यापूर्वी दोन्ही उमेदवारांनी देशाला चालविण्यासंबंधीची विविध धोरणे मांडली आहेत. निवडणुकीच्या मैदानात डोनाल्ड ट्रम्प यांची लढत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्याबरोबर आहे. सध्या दोन्ही उमेदवार जनतेला आकर्षित करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावत आहेत.

अमेरिकेत होणाऱ्या या अध्यक्षीय निवडणुकीची भारतातही जोरदार चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री कोणापासून लपलेली नाही. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले होते. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्री अनेक प्रसंगी जगजाहीर झाली आहे. त्यामुळेच काही भारतीयांनाही डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या सिंहासनावर बसलेले पाहायचे आहेत. तर दुसरीकडे भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी आपल्या आईसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करत भारतीयांना भावनिक साद घातली आहे.

कशी होते राष्ट्राध्यक्ष पदासाठी निव़डणूक?

अध्यक्षपदासाठी 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असली तरी ती निवडणूक अध्यक्षाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या मतदारांची निवडणूक आहे. अध्यक्षाच्या निवडणुकीत मतदान करणारा एक विशिष्ट मतदार वर्ग असतो. त्यालाच निर्वाचकगण- इलेक्टोरल कॉलेज म्हटले जाते. अर्थातच सामान्य मतदार अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सरळ मतदान करीत नाही. तो अध्यक्षाची नाही, तर अध्यक्षीय मतदारांची निवड करतो. तेथील अध्यक्षीय मतदारांची संख्या राज्यनिहाय निराळी आहे. अमेरिकेतील एकूण 50 राज्यातील अध्यक्षीय मतदारांची संख्या 535 आहे. परंतु अध्यक्षीय मतदारांची – निर्वाचकगणाची एकूण संख्या 538 आहे. त्यासाठी 23 वी घटनादुरुस्ती महत्त्वाची ठरली आहे. या दुरुस्तीला अनुसरून राष्ट्रीय राजधानी असलेल्या वाशिंग्टन, डी. सी. (डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया) साठी तीन अध्यक्षीय मतदार देण्यात आले आहेत. अर्थातच ही संख्या लहान राज्याच्या अध्यक्षीय मतदाराइतकी आहे. लहान राज्याची लोकसंख्या कितीही असली तरी त्यांची अध्यक्षीय मतदारांची संख्या तीन असते.

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांचा आज मुंबईत रोड शो | Marathi News

राष्ट्रवादीचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार

हिना गावित यांची राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या...

Sharad Pawar यांच्या प्रचारसभांचा धडाका, 55 प्रचारसभांचे आयोजन

दहावीच्या परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत अर्ज भरता येणार