नवी मुंबई : जागतिक उद्योजक दिवसानिमित्त काल नवी मुंबईत मराठी उद्योजकांनी कार्यक्रम आयोजित केला होता. मराठी माणसाने एकत्र येऊन उद्योग क्षेत्रात स्थान निर्माण करावं यासाठी एस. जी. टी. फाऊंडेशन कडून मराठी उद्योजकता दिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी स्वत: उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. देशाच्या औद्योगित क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमध्ये मुंबईचा मोठा वाटा आहे, याच मुंबईतून देशाच्या तिजोरीत मोठा निधी जातो. त्यामुळे ज्या मराठी माणसांची ही मुंबई (Mumbai) आहे, त्यांनी एकत्र राहून एकमेकांना सहकार्य करायलं हवं असं मत राणेंनी मांडलं.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं की, केंद्रीय मंत्री झाल्यावर मला सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योग खातं मिळालं. मी मराठी उद्योजकाच्या प्रतिक्षेत होतो, मात्र या कार्यक्रमात मला शेकडो लोक पाहायला मिळता आहेत. मराठी माणसासाठी हा उपक्रम गरजेचा आहे असं राणे म्हणाले. ३३ वर्षांपासून मी वेगवेगळ्या पदांवर काम करतोय, या सर्व प्रवासात माझ्याकडे अनेक लोक आले. त्यावेळी मी त्यांचे आडनाव तपासतो आणि मराठी असेल तर रिमार्क देतो. प्रत्येक मराठी माणसाने एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे असं राणे म्हणाले.
देशातले मोठे उद्योजक पाहिले तर त्यामध्ये मुकेश अंबानी, महिंद्रा असे नावं दिसतात. यामध्ये मराठी लोकं किती आहेत? त्यांची क्षमता किती आहे? मराठी माणसं प्रगतीसाठी विचार करतात असं मी मानत नाही. कारण मराठी माणूस दिवस ढकलायचं काम करतो. मात्र हा अंधार दूर सारण्यासाठी असे कार्यक्रम होणं गरजेचं असल्याचं राणेंनी सांगितलं.