आज दुसऱ्या दिवशीही संसदेत अविश्वास ठरावावरील चर्चेला सुरुवात झाली. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्यावरच ‘यू आर नॉट इंडिया’ असं म्हणत केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार स्मृती इराणी राहुल गांधींवर चांगल्याच कडाडल्या आहेत.
स्मृती इराणी म्हणाल्या की, 'देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेची हत्या केली, असं बोललं गेलं. काँग्रेस पक्ष त्यावेळी इथे टाळ्या वाजवत होता. भारत मातेची हत्या झाली, बोलल्यावर टाळ्या वाजवण्यात आल्या. यावरुन दिसून येतं, कोणाच्या मनात गद्दारीची भावना आहे. मणिपूर विभाजीत नाहीय, तो देशाचा अविभाज्य भाग आहे” असं स्मृती इराणी म्हणाल्या.
“तुमच्या सहकारी पक्षाचा नेता तामिळनाडूत काय म्हणाला? भारताचा अर्थ फक्त उत्तर भारत होतो. राहुल गांधी यांच्यामध्ये हिम्मत असेल, तर तुम्ही तुमचा सहकारी डीएमकेच म्हणणं खोडून दाखवा. काश्मीरला भारतापासून वेगळ केलं पाहिजे असं जो काँग्रेस नेता म्हणतो, त्यावर तुम्ही का बोलत नाही?” असं स्मृती इराणी म्हणाल्या.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत. कारण तुमच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केलंय, तोडलंय. काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो. पण आमचे पंतप्रधान गेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी भारत नाही. मणिपूरचे सत्य हेच आहे की, मणिपूर आता उरलेलंच नाही. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केले आहेत.