महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (११ मे) सुनावला आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही योग्य तो निर्णय घेण्याचा इशाराच दिला आहे.
“..तेव्हा मात्र तोंड दाखवायला जागा राहणार नाही”
“अध्यक्ष त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतीलच. त्यांनी उलट-सुलट काही केलं तर ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, त्याचप्रमाणे जर इथे काही वेडंवाकडं झालं तर पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. त्यानंतर जी काही बदनामी होईल, तेव्हा मात्र यांना जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाहीत. आज तर विधानसभा अध्यक्ष परदेशात आहेत. त्यांनी लवकरात लवकर यावं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घ्यावा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांना इशारा दिला आहे.
गद्दार आनंद का साजरा करत आहेत?
काही जणांनी काल आनंदोत्सव साजरा केला. भाजपने आनंद साजरा केला ते समजू शकतो. कारण डोईजड झालेलं ओझं उतवरण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. पण गद्दारांना आनंद होण्याची गरज काय? असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
पोपट मेला जाहीर करा
सर्वोच्च न्यायालयाने जो पोपट ठेवला आहे. तो हालत नाही. निश्चल आहे. तो बोलत नाही हे सांगून तो मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम विधानसभा अध्यक्षांकडे दिलं आहे. नार्वेकरांना राजकीय प्रवासाची कल्पना आहे. तो कसा करायचा हे त्यांना चांगलं कळतं. जगात महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे. ती अधिक होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.