Ashish Shelar Press Conference : विधान परिषद निवडणुकीत ११ जागांसाठी काल शुक्रवारी मतदान प्रकिया पार पडल्यानंतर सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत भाजपने त्यांच्या पाचही जागांवर बाजी मारल्याने महायुतीनं ९ पैकी ९ जागा जिंकल्या. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. शेकापच्या जयंत पाटील यांना पाडण्यामागेही उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा हात आहे, असं म्हणत शेलारांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर घणाघात केला आहे.
पत्रकार परिषदेत आशिष शेलार काय म्हणाले?
मुंबईच्या शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील यांच्या पक्षाच्या उमेदवाराला उबाठा सेनेनं मदत केली नाही. उद्धव ठाकरेंनीच कपिल पाटील यांच्या पक्षाची स्थापना केली होती. त्या कपिल पाटील यांनाही संपवण्याचा प्रयत्न केला. शेकापच्या जयंत पाटील यांना पाडण्यामागेही उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा हात आहे. आपलं कुणी ऐकलं नाही, तर त्याच्याविरोधात काम करायचं. अशी त्यांची वर्तणूक आहे. आता राजू शेट्टी, कपिल पाटील, जयंत पाटील यांच्यानंतर शरद पवार गटाचा पुढचा नंबर असू शकतो. त्यांच्याशी वितुष्ठासारखं वागणं हे आता उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष करेल, हे भाकीतच मी आज करत आहे.
कालच्या मतांची टक्केवारी पाहता, असा दावा केला जात आहे की, काँग्रेसची ७ मतं फुटली आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, खोटं बोलणे, फेक नरेटिव्ह चालवणे, भ्रम पसरवणे हेच महाराष्ट्र विकास आघाडीचं काम आहे. हिशोब सोपा आहे. भारतीय जनता पक्षाचे स्वत:चे १०३ आमदार, मित्रपक्ष आणि अपक्ष मिळून आमच्याकडे ११० आमदार आहेत. पण आम्हाला ११८ मतं पडली. आम्हाला ८ मतं अधिक पडली आहेत. शिवसेना-शिंदे गटाचे ओरिजनल ३८, अपक्ष आणि मित्रपक्ष धरून ४७ आहेत. त्यांना ४९ मतं पडली आहेत. म्हणजेच एकनाथ शिंदे गटाला २ मंत अधिक मिळाली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांची स्वत:ची आणि मित्रपक्ष पकडून ४२ मतं होती. पण त्यांना ४७ मतं पडली आहेत. म्हणजेच त्यांना ५ मचं अधिक मिळाली आहेत. महायुतीला १५ मंत अधिक मिळाली आहेत. काँग्रेसची सात मतं फुटली, असं धरून चालू. तरीही ८ मतं कुणाची फुटली आहेत. ही ८ मतं गुलदस्त्यात आहेत. या गुलदस्त्यातील मतांमध्ये काँग्रेससोबत, उबाठा सेनेची मतं फुटली आहेत. तसच अन्य पक्षांचीही मतं फुटली आहेत, असं आम्ही खात्रीनं सांगू शकतो. उबाठा सेनेनं हा दावाच करू नये की, त्यांची मतं त्यांच्याबरोबर राहिली आहेत. त्यांची किमान दोन मंत फुटली आहेत.