Uddhav Thackeray On Narendra Modi And Amit Shah : गुजराती लोकांबद्दल माझा राग नाही. गुजराबद्दल तर अजिबात नाही. पण दोन सूरतवाल्यांनी मुंबईचं आणि महाराष्ट्राचं वैभव लुटून गुजरातला नेत आहेत. त्या लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचं आहे. मराठी अस्मिता सांभाळणारी शिवसेना त्यांना आता नकली वाटायला लागली आहे. स्वत:च्या पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणारा उद्धव ठाकरे आता त्यांना नकली वाटायला लागला आहे. आम्ही यांचं राजकारण संपवायचं नाही, तर काय करायचं? अजूनही यांच्या पालख्या वाहायच्या का? कोरोना काळात गंगा नदीत मृतदेह सोडून दिले जात होते, तेव्हा मोदी तुम्ही त्या गंगा मातेचे अश्रू पुसायला गेला होता का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत काळाचौकी येथे बोलत होते.
उद्धव ठाकरे जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, मुंबई ज्या ज्या वेळी संकटात सापडते, कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो, बॉम्बस्फोट असो किंवा अपघात असो, बाळासाहेबांचा शिवसैनिकच त्यावेळी धावून जातो. रक्तदान करायला शिवसैनिक पहिली रांग लावतो. समोर ज्याला आपण वाचवतोय, तो हिंदू आहे की मुस्लिम हे पाहत नाही. कुणीही असला तरी त्याला वाचवणं हे आमचं हिंदूत्व आहे. ज्याला रक्ताची गरज आहे, त्यांच्यासाठी आम्ही रक्तदान करतोय, हे आमचं हिंदूत्व आहे. आता तुमच्यासमोर काहीही राहिलं नाहीय. भाजपकडे सांगायला आता काहीही नाही, म्हणून ते सांगतात की, काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिमांचा आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा हा माओवाद्यांचा आहे, असं ते कालच्या सभेत म्हणाले. पण भाजपचा जाहीरनामा खाओवादी आहे. जिकडे जाल तिकडे खा, जिथे जाऊ तिथे खाऊ. ही मोदींची गॅरंटी आहे. तुमच्या दीडशे कोटींची प्राप्तिकर विभागाची केस आहे, तुम्ही आमच्याकडे या, काहीही होणार नाही. म्हणून हे लोक तिकडे गेले आहेत. तुम्ही धाडी टाकल्या, तुमच्यावर आरोप केले आणि तुमच्यासोबत गेल्यावर सर्व साफ झालं. अशी ही भाकड जनता पार्टी आहे. भारतीय जनता पक्ष अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींच्या काळात होता.
आता जो मोदींच्या नेतृत्वात आहे, तो भाकड जनता पक्ष आहे. यांना राजकारणात पोरंच होत नाहीत. भ्रष्टाचारी तर भ्रष्टाचारी पण आम्हाला कडेवर घ्यायला कुणीतरी पाहिजे. प्रचारालाही यांना भाडोत्री नेते लागतात. यांच्या नावाने मैदान सुद्धा यांना बुक करता येत नाही. या लोकांनी दहा वर्ष देशाचं नुकसान केलं आहे. ४ जूननंतर जुमलायुग संपणार आहे. ४ जूननंतर इंडिया आघाडीचा जो पंतप्रधान होईल, त्यासाठी मोदी आणि अमित शहांना आमंत्रण देतोय. आम्ही नवाज शरिफला आमंत्रण देत नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.