देवेंद्र फडणवीस मला भ्रमिष्ठ म्हणाले. मी भ्रमिष्ट आहे की नाही, हे लोक ठरवतील. पण देवेंद्रजी तुमची परिस्थिती खूप वाईट झाली आहे. फडणवीसांनी जनाची नाही,तर मनाची ठेवावी. तुमच्यासाठी खूप खोल्या ठरलेल्या असतील, त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता, हे पाहण्याची आमची इच्छा नाही. मातोश्रीत जे मंदिर मानतो, ती बाळासाहेबांची खोली आहे. त्याच खोलीत अमित शहा बाळासाहेबांच्या फोटोसमोर नाक रगडायला आले होते.अमित शहांनी फडणवीसांना बाहेर बसवलं होतं. त्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्व माहित नाही. ती खोली आमच्यासाठी मंदीर आहे. बाळासाहेबांच्या खोलीबद्दल माझ्या भावना अत्यंत संवेदनशील आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा समाचार घेतला आहे. ते मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत बोलत होते.
ठाकरे जनतेशी संवाद साधताना म्हणाले, अलीकडेच अमित शहा आले होते. अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी मी सांगितलं होतं. त्यानंतर दोन-तीन महिन्यात लोकसभा निवडणूक होत्या. त्यानंतर विधानसभा निवडणूक होत्या. त्या चार-पाच महिन्यांच्या काळात देवेंद्र मुख्यमंत्री होते. आदित्यने तेव्हा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आधी लोकसभेच्या वेळी विधानसभेचा विचारच केला नव्हता. मला देवेंद्र म्हणाले, मी आदित्यला चांगला तयार करतो.
अडीच वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू. मी त्यांना म्हणालो, लहान आहे तो. त्याच्या डोक्यात असं काही बिंबवू नका. आमदार म्हणून तो त्याची कारकिर्द सुरु करतोय. तुम्ही त्याला तयार नक्की करा. पण मुख्यमंत्री पद डोक्यात घालू नका. आदित्यला तुम्ही मुख्यमंत्री करायचं, असं तुम्ही म्हणतायत, मग तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम कराल का, तेव्हा ते म्हणाले, अडीच वर्षानंतर मी दिल्लीत जाणार.
अशोक चव्हाणांच्या सभेत लोकांनी गोंधळ घातला आहे. आता लोक त्यांची विचारपूस करत नाहीत. त्यांची वाईट अवस्था झाली आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चव्हाणांवरही टीका केली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत ते म्हणाले, मोदी दर पाच वर्षांनी निवडणुका आल्यावर जनतेला खोटी आश्वासनं देतात. आता तर ते २०४७ पर्यंतची आश्वासने देत जनतेची दिशाभूल करत आहेत.