राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या गटाने द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, मात्र उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत ते विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर संजय राऊत यांनी अल्वा यांना पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन करून उद्धव ठाकरेंना एकटं पाडलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मुंना पाठिंबा दिला. त्यामुळे ते पुन्हा भाजपकडे जाणार अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्यांनी आता पुन्हा एकदा विरोधीपक्षाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिल्यानं त्यांच्या भुमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांची एकजूट आहे. 'द्रौपदी मुर्मू ही आदिवासी महिला असून देशातील आदिवासींबद्दल लोकांना सहानुभूती आहे. आमचे अनेक आमदार, खासदार हे देखील आदिवासी समाजातील आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांना आमचा पाठिंबा जाहीर केला आहे.' मात्र उपराष्ट्रपती पदासाठी आम्ही मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणार आहोत. राष्ट्रपती पदासाठी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याचा अर्थ ते भाजपला पाठिंबा देत आहेत असा नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. भाजपसोबतची अनेक दशकांची युती तोडल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससह महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. गेल्या महिन्यात आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आणि सरकार पडलं. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आता उद्धव ठाकरे पक्ष वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचं पाहायला मिळतंय.