आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर टीका केली आहे. निवडणूक २३ जानेवारीला होणं अपेक्षित होतं. ती निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी केली आहे. एकतर ही निवडणूक आम्हाला घेण्याची परवानगी द्या. नाहीतर जे आहे तसंच चालू ठेवा. आयोगाकडून अजून तसं काही उत्तर आलेलं नाही. आयोगाच्या परवानगीनंतर रीतसर निवडणूक होईल. या घटनेनुसारच शिवसेनेतील पदांचा उल्लेख केला आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“कोंबडं आधी की अंडं आधी हा प्रश्न उरतोच. २० जूनला पक्षादेश मोडून गेलेल्यांनी शिवसेनेवर दावा सांगावा हे अत्यंत नीच आणि विकृत कृत्य आहे. अपात्रतेचा फैसला आधी व्हायला हवा. हे घडलं जून महिन्यात. जुलैमध्ये हा गद्दार गट आयोगाकडे गेला आणि त्यांनी शिवसेनेवर दावा सांगितला. “मुद्दा स्पष्ट आहे. कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होत असतो. जर पक्ष फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल, तर उद्या देशातले दोन तीन नंबरचे उद्योगपती आमदार-खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्याला गद्दारी म्हणतात. पक्ष दोन पातळीवर असतो. एक वैधानिक म्हणजे विधिमंडळ, दुसरं संसदीय आणि त्यापलीकडचा मोठा पक्ष रस्त्यावरचा असतो. जो पक्ष आपला नेता, आपली घटना पाळतो. जी घटना शिवसेनेला आहे. त्या घटनेनुसार निवडणुका होतात. असे ठाकरे म्हणाले आहेत.
यासोबतच त्यांनी म्हटले आहे की, पाठित खंजीर खुपसणाऱ्यांचं काय होणार? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी १४ तारखेपासून सलग होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झालेली आहे. शिवसेनेनं आमच्याकडून आमचं म्हणणं लिखित स्वरूपात सादर केलं आहे. “शिवसेनाप्रमुख हे पद बाळासाहेब ठाकरेंनाच शोभून दिसते. म्हणून तो शब्द आम्ही गोठवला किंवा तसाच ठेवला. त्यानंतर मी शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं आणि गेली काही वर्षं मी कारभार बघतोय. शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या गद्दारांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्यांनी शिवसेनेची घटनाच आम्हाला मान्य नाही असं सांगितलंय. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.