राज्यामध्ये झालेल्या मोठ्या सत्तांतरानंतर राजकीय घमासान थांबेल अशी शक्यत होती. मात्र आता 40 आमदारांचा गट फूटून भाजपमध्ये (BJP) गेल्यानंतर दुसरी लढाई शिवसेना वाचवण्यासाठी सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. सत्तागेल्यानंतर शिवसेनेला आता पक्ष आणि संघटना वाचवणं महत्वाचं असणार आहे. भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी आमचा गट हीच मूळ शिवसेना असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर मात्र नवं आव्हान निर्माण झालं आहे. आज त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आहे. शिवसेनेच्या चिन्हाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही, की चिन्ह बदलणार आहे. कायदेतज्ञांशी बोलून मी हे तुम्हाला सांगतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. मात्र फक्त धनुष्यबाण हाती घेतलेल्या लोकांची सुद्धा चिन्ह मतदार बघत असतात असंही ते पुढे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व घडामोडी घडून गेल्यानंतर मलाही दु:ख झालं असून, शिवसैनिकांवर दडपण येऊ नये, त्यामुळे वातावरण हलकं करण्याचा मी प्रयत्न करतोय असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. काही दिवसांपासून अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र ती चिंतेची बाब नसून, ते त्यांच्या आग्रहामुळे गेले असल्याची शक्यता आहे असं ठाकरे म्हणाले. कितीही आमदार पक्ष सोडून गेले तरी पक्ष जात नसतो, हे मी विश्वासानं सांगतो असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना असंही सांगितलं की, विधानसभेच्या निवडणुका झाल्या पाहिजे. निवडणूक लढवा, लोक कुणासोबत आहेत हे समजेल. आम्हाला जनतेने घरी बसवलं तर घरी बसू असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच किरीट सोमय्या यांनी माफिया मुख्यमंत्री हा शब्द वापरल्यावर शिंदे गटातील लोकांना दु:ख झालं हे पाहून बरं वाटलं. मात्र त्याच लोकांच्या गळाभेटी घेताना, त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसताना काही वाटलं नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीच्या निमित्ताने मला पंढरपूरला येण्याची विनंती वारकऱ्यांनी केली होती, त्यावर मी त्यांना हा सर्व गदारोळ झाल्यानंतर येणार असं सांगितलं आहे.