मुंब्य्रातील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा शिंदे गटाने ताब्यात घेत बुलडोझरने पूर्णपणे जमीनदोस्त केली. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याच घटनेच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. पण त्यांच्या मुंब्रा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण तापलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्र्यात अतिशय हालव्होल्टेज घडामोडी बघायला मिळत आहेत. शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जी शाखा पाडण्यात आली ती शाखा आपलीच होती, असा दावा शिंदे गटाचा आहे. तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्या शाखेवर दावा करत आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे बॅनर शहरात लावले होते. पण रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन काही लोकांनी ते बॅनर फाडण्यात आले.
शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहता पोलिसांनी उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात शाखा परिसरात येण्यास मनाई केल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात कलम 144 ची नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली होती. पण नंतर हीच नोटीस पोलिसांनी रद्द केल्याची माहिती समोर आली.