Udaypur Murder Case : राजस्थानमधील उदयपूर शहरातील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील मालदास स्ट्रीट येथे भरदिवसा दोघांनी एका तरुणाचा गळा चिरून खून (murder) केला. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्याची हत्या करुन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर राज्यस्थानमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. संपुर्ण राजस्थानातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून कलम 144 लागू केला आहे. या प्रकरणात केंद्र सरकारही कठोर पावले उचलली आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला आहे.
उदयपूरमध्ये तालिबानी पद्धतीने कन्हैलाल यांची हत्या केल्यानंतर संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू आहे. राजस्थानमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून २४ तास इंटरनेट बंद करण्यात आले आहे. एका महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. कलम 144 लागू असतानाही भाजपने बंद पुकारला आहे. मृत कन्हैयालाल साहूचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांचे पार्थिव घरी नेण्यात आले आहे.
हत्येतील दोन आरोपी गौस मोहम्मद आणि रियाज जब्बार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी NIA आणि SIT उदयपूरला पोहोचले आहेत. चौकशीनंतर एनआयए तपास हाती घेऊ शकते.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले- योजना आणि कट होता का? ते कोणाशी जोडलेले आहे? आंतरराष्ट्रीय दुवा म्हणजे काय? या सर्व बाबी उघड होतील. काही समाजकंटक आहेत, ते सामील झाल्याशिवाय अशी घटना घडत नाही. या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे.