अकोला (अमोल नांदूरकर) : तेल्हारा तालुक्यातील मनब्दा गावातील ऋषी संतोष सुरळकार, सागर संतोष दांडगे या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सातवीत शिकत असणारे या दोन विद्यार्थ्यांचा मनब्दा येथील विद्रुपा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे सर्व मनब्दा गाव व तेल्हारा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Two children drowned in Vidrupa river pond in Akola)
या दोन्ही मुलाचे आई वडील हे शेतमजुरी करण्यासाठी शेतात गेले होते. मुलावर कुणीही लक्ष द्यायला नव्हते. ही दोन्ही मुलं गावाबाहेर असलेल्या तलावात आंघोळ करण्यासाठी गेले होते. मात्र तलावातील पाण्याचा त्यांना अंदाज न आल्यामुळे त्यांचा त्यात बुडून दुर्देंवी मृत्यू झाला आहे.
नुकतच केलेल्या खोलीकरणामुळे नदीला तलावाचे रूप आले आहे. त्यामुळे मुलांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. आणि त्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मनब्दा गावातील माजी सरपंच गोपाल राऊत, प्रदीप पाथरीकर, पोलीस पाटील व इतर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी तातडीने तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड यांना दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेत तेल्हारा ठाणेदार व त्यांच्या टीमने घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.