एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकच खळबळ माजली होती. आता हे पद कोणाकडे जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरु होत्या. अशातच एलॉन मस्क यांनी स्वतः ट्वीट करत ट्विटरला नव्या सीईओची गरज आहे आणि एक महिला ट्विटरची सूत्रं हाती घेईल, असं ट्वीट केलं होतं. आता एलॉन मस्क यांनी पुन्हा एक ट्वीट करुन ट्विटरच्या नव्या सीईओच्या नावाची घोषणा केली आहे.
ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी शुक्रवारी (12 मे) रोजी एक ट्वीट केलं, त्यांनी या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, "मी ट्विटरच्या नव्या सीईओ म्हणून लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) यांचं स्वागत करण्यास उत्सुक आहे." लिंडा प्रामुख्यानं व्यवसाय ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रीत करतील, तर मी उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करेन. ट्विटरला सर्व गोष्टींसह अॅप 'X' मध्ये रूपांतरित करण्यासाठी लिंडासोबत काम करण्यास उत्सुक आहे."
लिंडा याकारिनो कोण आहेत?
लिंडा याकारिनो यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, याकारिनो 2011 पासून एनबीसी युनिव्हर्सलमध्ये काम करत आहेत. त्या सध्या ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग आणि पार्टनरशिप्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी कंपनीच्या केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्री विभागासाठी काम केलं आहे.
याकारिनो यांनी टर्नर कंपनीत 19 वर्ष कामही केलं. 1981 ते 1985 या काळात त्यांनी पेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये (Penn State University) शिक्षण घेतलं. त्यांनी लिबरल आर्ट्स आणि टेलिकम्युनिकेशन विषयात शिक्षण घेतलं आहे.