ठाणे | मयुरेश जाधव : थेट चंद्रावर जागा घेणाऱ्या उल्हासनगरच्या व्यापाऱ्यावर आता पृथ्वीवरची 770 स्क्वेअर फूट जागा लाटून परस्पर विकल्याप्रकरणी फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम वाधवा (Ram Wadhwa buys land on moon) असं या व्यापाऱ्यांचं नाव असून त्यांनी 2020 साली चंद्रावर जागा घेतल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, वाधवा यांनी हा गुन्हा राजकीय दबावापोटी दाखल करण्यात आल्याचा दावा केलाय.
राम वाधवा यांच्यासह अन्य दोघांवर जमीन लाटून परस्पर विकल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. उल्हासनगरातील कापड व्यापारी परमानंद माखिजा यांची उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील ओटी सेक्शनमध्ये 770 स्क्वेअर फूट जागा होती. ही जागा 2019 साली बनावट कागदपत्रांच्या आधारे राजेश तलरेजा यांना विकण्यात आली. भरत रोहरा, अजीज शेख आणि राम वाधवा या तिघांनी संगनमत करून जागेची खोटी कागदपत्रं बनवली आणि त्याआधारे स्थानिक वृत्तपत्रात हरकतीची सूचनाही प्रसिद्ध केली, तसंच राजेश तलरेजा यांच्याकडून 50 हजार रुपये टोकन घेऊन त्यांना ही जागा विकली, असा जागेचे मूळ मालक परमानंद माखिजा यांचा आरोप आहे.
दरम्यान, याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विठ्ठलवाडी पोलिसांनी आयपीसी 420, 465, 468, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. यामध्ये आरोपी म्हणून भरत रोहरा, अजीज अमीर शेख आणि राम वाधवा यांची नावं टाकण्यात आली आहेत. दरम्यान, याबाबत राम वाधवा यांना विचारलं असता, हा गुन्हा राजकीय दबावापोटी दाखल करण्यात आलेला असून माझी चंद्रावर जमीन असताना मी इथे जागा कशाला बळकावेन? असा सवाल त्यांनी केला. तसंच आपण पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असून या प्रकरणात काहीही कागदपत्रच नसल्यानं पुढे काहीही निष्पन्न होणार नाही, असंही ते म्हणाले.