भाजप आमदाराची गोव्यात दारू बंदीची मागणी करण्यात आली आहे. गोव्यात पर्यटक केवळ मद्यासाठी येत नाहीत, गोव्याचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येतात असं भाजप आमदार पेमेंद्र शेट यांचं वक्तव्य आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशनात प्रेमेंद्र शेट यांनी मद्यबंदीची मागणी लावून धरली आहे.
गोवा हे नाव जरी ओठावर आलं तर अनेकांच्या नजरेसमोर येतो उधाणलेला समुद्र आणि बाटलीतून फेसाळत बाहेर पडणारे मद्य. गोवा म्हणजे मजा, मस्ती आणि मद्य, असे समीकरण गोव्यात जाणाऱ्या प्रत्येकाचे असते. गोव्यात येऊन नुसता धिंगाणा करायचा, असं प्रत्येकाला वाटतं. मात्र गोव्यातल्या लोकप्रतिनिधिंना आता असं वाटत नाही. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आपापले मुद्दे रेटत असताना भाजपाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मद्यबंदीची मागणी लावून धरली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना प्रेमेंद्र शेट यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. ते म्हणाले, “गोव्यामध्ये गेल्या काही वर्षात मद्याच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या वाढली आहे. मद्य सेवनामुळे काही जणांचा मृत्यू ओढवला आहे. हे सर्व थांबविण्यासाठी मी मद्यबंदीची मागणी सरकारकडे केली. गोव्यात पर्यटक केवळ मद्यासाठी येत नाहीत. तर येथील सौंदर्य पाहण्यासाठीही अनेक पर्यटक येतात.”