मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे.
जरांगेची प्रकृती काल रात्रीपासून खालावली असून रात्री डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचार घेण्यास विनंती करण्यात आली मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यापासून नकार दिला.
जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत उपचार घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अहमदनगरच्या कर्जत शहर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदचा कर्जत तालुक्यात चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आलं. बंदला व्यापारी, नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत असून सकाळपासूनच शहरातील सर्व दुकानं बंद आहेत.