भूपेश बारंगे | वर्धा: वर्ध्यात चार नगर पंचायत आहे. कारंजा (घाडगे), आष्टी, सेलू आणि समुद्रपूर या नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे अडीच वर्षाचा कालावधी येत्या 14 आणि 15 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी नगराध्यक्ष पदाची आरक्षण अद्यापही निघाला नसल्याने सत्ताधारी पक्ष सध्या आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे. नगराध्यक्ष पदाचा आरक्षणाचा तिढा कधी सुटणार हा प्रश्न आता राजकीय पक्षांना पडला आहे.
राज्यात अंदाजे 105 नगर पंचायतच्या अडीच वर्षापूर्वी निवडणूक पार पडली असल्याचे समजते. त्यानंतर अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. आता या नगराध्यक्षाचा कालावधी या ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत आतापर्यंत निघायला पाहिजे होते, मात्र अद्यापही आरक्षण निघाले नाही. यात वर्ध्यातील चार नगर पंचायतचा समावेश आहे. या नगर पंचायतवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, भाजप अशा राजकीय पक्षाची सत्ता आहे. अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष पदाची निवड होत नगराध्यक्ष विराजमान झाले, मात्र त्यांचा कालावधी आता ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. त्यामुळे पुढील नगराध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होणे गरजेचे होते. मात्र अद्यापपर्यंत आरक्षण जाहीर झाले नसल्याने याचा नागराध्यक्षाचा कालावधी वाढणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.आरक्षण सोडतचा घोड कुठं अडलंय अस प्रश्न आता सत्ताधारी करत आहे.
अडीच वर्ष संपण्याचा कमी कालावधी आहे. अवघ्या आठ दिवसात कालावधी संपणार असून याचे आरक्षण न निघाल्याने नव्याने नगराध्यक्ष पदाचे स्वप्न बघणाऱ्या नगरसेवकांचे स्वप्न भंगणार का? आतापर्यंत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत निघाले असते तर नगराध्यक्ष पदाचे कोणाची वर्णी लागते त्यासाठी आपली फिल्डिंग लावल्या गेली असती मात्र आरक्षण सोडत न निघाल्याने सत्ताधारी पक्ष आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे.
नगराध्यक्ष पदाचे स्वप्न भंगणार?
अडीच वर्षापूर्वी नगराध्यक्ष स्वप्न मनाला घेऊन बसलेले नगरसेवकांची हिरमोड झालेली दिसत आहे. ऑगस्ट महिण्यात नगराध्यक्ष पदाचा कालावधी संपणार आहे. अन् नव्याने अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष बनणार होते, त्यांचे मात्र स्वप्न भंगणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अजूनही निघाले नसल्याने नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड होणार नाही. त्यामुळे स्वप्नपूर्ती कधी होणार या आशेवर नगरसेवक आहेत.