महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी- मार्च २०२५मध्ये होणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक काही संकेतस्थळांवरून जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
याच पार्श्वभूमीवर आता दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकाबाबत बोर्डाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. राज्य मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच परीक्षेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले.
राज्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे की, दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांची सविस्तर वेळापत्रके अधिकृत संकेतस्थळावर अजून प्रसिध्द करण्यात आलेलं नाही. त्यामुळे समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली वेळापत्रके ग्राह्य धरु नये. तर http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर परिक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.