अंधेरी पूर्व-पश्चिमसह पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ब्लॉक कालावधीत लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याने येत्या आठवड्यापासुन प्रवाशांच्या त्रासात भर पडण्याची शक्यता आहे. रोज सरासरी 3-4 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.
मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वेकडून गोखले पुलाची उभारणी करण्यात येत आहे. गोखले पुलाचा गर्डर साधारण 90 मीटर लांबीचा आहे. गर्डरचे सुटे भाग एकत्र करून त्यांची जोडणी गोखले पुलाजवळ करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. जमिनीपासून 25 मीटर उंचीवर गर्डर टाकण्यात येणार आहे. गर्डरचे वजन सुमारे 1300 टन असल्याने विशेष क्रेनच्या मदतीने गर्डर उभारण्यात येणार आहे. 48 वर्षांपूर्वी गोखले पूल उभारण्यात आला होता. नव्या पूलासाठी सुमारे 90 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.