अमजद खान|कल्याण : पतपेढीमध्ये काम करणाऱ्या एका महिला क्लर्कनेच पतपेढी मधील तेरा लाखांचे सोने चोरल्याची घटना डोंबिवलीमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतपेढीने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत आरोपी महिलेकडून चोरलेले तेरा लाखांचे दागिने हस्तगत केले व आरोपी महिलेला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील गोपाळ नगर परिसरात आनंद प्रेम नागरी सहकारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेमधून सुमारे 13 लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाले होते. दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच पतपेढी तर्फे याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या तपासा दरम्यान ही चोरी पतपेढीमध्येच काम करत असलेल्या एका महिलेने केली असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या महिलेकडे चौकशी केली असता तिने सोन्याचे दागिने चोरी केल्याचे कबुली दिली.
दरम्यान हे दागिने लॉकर मध्ये ठेवण्यात आले होते. या महिलेने पतपेढी मध्ये कोणीही नसल्याने संधी साधत तिने आधी लॉकरची चावी चोरली या चावीच्या आधारे लॉकर उघडुन दागिने चोरले. चोरी केल्यानंतर आरोपी महिलेने या मधील काही सोन्याचे दागिने एका सोनाराला विकले होते. पोलिसांनी याप्रकरणी या महिलेला ताब्यात घेतलं असून चोरी केलेला मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.