सायन-धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. रेल्वेला 4 जानेवारीनंतर पूल पाडण्याची बीएमसीकडून परवानगी देण्यात आली आहे. रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी पूल पाडण्यात येणार असून हा पूल जीर्ण झाला आहे. सायन रेल्वे स्थानकासमोरील हा 110 वर्षे जुना पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. सायन धारावीला जोडणारा हा पूल तोडण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांना पुन्हा पूलबंदीचा सामना करावा लागणार आहे.
4 जानेवारीला माहीम जत्रा संपल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची परवानगी महापालिकेने मध्य रेल्वेला दिली आहे. माहीमची जत्रा संपल्यानंतर कोणत्या दिवशी हा पूल बंद ठेवायचा याचा निर्णय मध्य रेल्वेने अद्याप घेतलेला नाही. पूर्व द्रुतगती मार्ग आणि धारावी, माहीम आणि वांद्रे यांना जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज हा महत्त्वाचा कनेक्टर आहे आणि 110 वर्षे जुना आहे. सायन रेल्वेवरील पूल सद्यस्थितीत 40 मीटर लांब आहे. तो 51 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. अहवालानुसार हा पूल दोन स्पॅनवर असून त्याचा एक खांब रेल्वे मार्गावर आहे. नवीन पूल एकाच स्पॅनवर असेल आणि रेल्वे मार्गावर खांब नसेल.
हा पूल बंद झाल्यानंतर पर्यायी मार्ग कोणते?
१. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पूर्व द्रुतगती मार्गावरून कुर्ला मार्गे पश्चिम उपनगरापर्यंत
२. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सायन हॉस्पिटलजवळील सुलोचना शेट्टी मार्गावरून रस्त्याने धारावीतील कुंभारवाडी येथे जाणार आहेत.
३. चारचाकी वाहने चुनाभट्टी-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कनेक्टर मार्गे बीकेसीला उतरू शकतात. मात्र त्यावर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना परवानगी नाही.