संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन आता भाजपावर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे.
सामनातून म्हटले आहे की, सद भवनाच्या उद्घाटनावर २० राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला यावर भाजपाचे लोक टीका करत आहेत, पण सत्य असे आहे की २० प्रमुख पक्षांचा विरोध हा संसदेच्या उद्घाटनाला नाही तर उद्घाटनाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना नाही हा वादाचा मुद्दा आहे.वे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट आहे, उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहिल मी आणि फक्त मीच असे मोदींचे धोरण आहे. उद्धव ठाकरेंना बोलवतेच कोण असे सवाल देवेंद्र फडणवीस वगैरेंनी विचारले. ही त्यांची टाळकुटी संस्कृती आहे. ज्या आडवाणींमुळे भाजपाला अच्छे दिन पाहायला मिळाले आहेत त्यांना तरी नव्या संसदेच्या उद्घाटनाला बोलावले आहे का? असे सामनातून म्हटले आहे.
तसेच भारतीय जनता पक्ष लोकांना भ्रमित करण्यात पटाईत आहे. लोकांना पेडगावचा रस्ता दाखवायचा व वेडगावला न्यायचे असे त्याचे धोरण आहे.नवे संसद भवन हे काही एखाद्या पक्षाच्या मालकीचे नाही. नटवरलाल नावाच्या एका भामट्याने संसद, राष्ट्रपती भवन, ताजमहाल, इंडिया गेट बनावट कागदपत्रांद्वारे विकल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे तसे हे नवे संसद भवन बनावट कागदपत्रांद्वारे कुणी मालकीचे करुन घेतले की काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.