ठाकरे गटातील कोणता ना कोणता नेता शिंदे गटात प्रवेश करत आहे. यामुळे ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता बीडमधून बातमी येत आहे. ठाकरे गटाचे बीडमधील जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडिओमुळे ठाकरे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सुषमाताई अंधारे आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या पैसे मागत आहेत. आपल्या कार्यलयात एसी, फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी त्या पदाधिकाऱ्याकडून पैसे घेत आहेत. माझ्या लेकरा-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करून मी पक्ष वाढवत आहे. याकडे सुषमा अंधारेंचं लक्ष नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंचा आणि माझा वाद झाला. या वादात मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या. सुषमाताई अंधारे सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत. त्या माझंही पद विकत आहेत. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. रक्ताचं पाणी करत आहे. असे ते म्हणाले. मात्र असे काही नसल्याचे सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, स्टेजची पाहणी करायला गेलो होतो.आप्पासाहेब जाधव काही गोष्टींवर बोलले. ते बऱ्यापैकी नाराज होते. त्यांच्या नाराजीचे कारण होते. ते म्हणजे त्यांचा बॅनरवर फोटो नव्हता. मी त्यांना आपण बोलू असं म्हणाले. त्यानंतर गाडीत मी फेसबूक लाईव्ह करून सभेच्या तयारीची माहिती देत होते. त्याचवेळी त्यांनी एका मुलाला काही कामं सांगितली. तेव्हा त्या मुलाने मी मजूर नाही, नीट बोला असं सांगितलं. यानंतर मी जिल्हाप्रमुख आहे, माझ्याशी असं बोलतो का? असे म्हणाले. त्यानंतर भांडण आणि मारामारी झाली. असे अंधारे म्हणाल्या.