भूपेश बारंगे, वर्धा | वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रात मेघे समूह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वर्षांपासून कार्यरत असून आरोग्यसेवा क्षेत्रातही कार्यरत असलेल्या या समूहातील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाला विदेशातील पाहुण्या रुग्णाला वैद्यकीय सेवा देण्याची संधी नुकतीच प्राप्त झाली. सावंगी रुग्णालयाच्या शालिनीताई मेघे सुपरस्पेशालिटी सेंटरमध्ये टांझानिया येथून आलेल्या एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
गत आठवड्यात पूर्व आफ्रिकेतील टांझानिया येथून बर्नार्ड सोस्थेनेस हा 37 वर्षीय तरुण दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या आपल्या भावाला भेटण्यासाठी सावंगीला आला होता. या भेटीदरम्यान त्याच्या पोटात आकस्मिक दुखणे सुरू झाल्यामुळे त्याला सावंगी रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी मूत्ररोग विभागात यूरोलॉजिस्ट डॉ. जय धर्माशी यांनी रुग्णाची पूर्वतपासणी केली व तातडीने सी.टी. स्कॅन करण्यात आले. या तपासणीत किडनी म्हणजेच मूत्रपिंडापासून मूत्राशयाकडे जाणारी नलिका आकुंचन पावल्यामुळे त्यात अडथळा निर्माण झाल्याचे व किडनीत मूत्रखडे असल्याचे आढळून आले. रुग्णाची पोटदुखी वाढल्याने डॉ. धर्माशी यांनी रुग्णाला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र, हा रुग्ण विदेशी नागरिक असल्याने वैद्यकीय उपचारांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील औपचारिकता पूर्ण करणे बंधनकारक होते.
सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे यांनी तातडीने याबाबतची कायदेशीर पूर्तता केली आणि रुग्णाला सुपरस्पेशालिटी सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. यावेळी पायलोप्लास्टी आणि पायलो लिथोट्रिप्सी असे संबोधल्या जाणाऱ्या या शस्त्रक्रियेद्वारे मूत्रखडे काढण्यासोबतच किडनीशी जुळलेल्या आकुंचित मूत्रनलिकेला छेद देत त्यात स्टेण्ट टाकण्यात आले. या शस्त्रक्रियेत डॉ. जय धर्माशी, डॉ. अभिजित ढाले, डॉ. ऋतुराज पेंडकर, डॉ. शिवचरण भालगे, डॉ. घनश्याम हटवार तसेच बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. विवेक चकोले, डॉ. वर्मा यांचा सहभाग होता.
शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पूर्णतः स्वस्थ असून वैद्यकीय चमू व व्यवस्थापनाने रुग्णाची भेट घेऊन सदिच्छा दिल्या असल्याचे संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी सांगितले. तर, विदेशी रुग्णावर आकस्मिक परिस्थितीत झालेली ही पहिलीच शस्त्रक्रिया असून यापूर्वी बांगलादेशातील रुग्णांनी स्माईल ट्रेन प्रकल्पांतर्गत दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या शस्त्रक्रियांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला असल्याचे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांनी सांगितले.