पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर देखील या प्रकरणी कारवाई सुरू होती. यावेळी एका वाहनचालकाला अडवण्यात आले असून त्याला कागद पत्र विचारले असता त्याने रागाच्या भरात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर थेट पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. पुण्यातील प्रचंड वर्दळीच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या जवळच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ड्रंक ॲंड ड्राईव्ह ची कारवाई सुरु असताना ही घटना घडली. हे कृत्य अतिशय संतापजनक आहे. थेट पोलीसांवर हात टाके पर्यंत गुन्हेगार या राज्यात निर्ढावले आहेत.
यासोबतच त्या म्हणाल्या की, एकिकडे अशा घटनांमुळे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होत असून दुसरीकडे सर्वसामान्य माणूस भीतीच्या सावटाखाली जगतोय ही सत्य परिस्थिती आहे. गृहमंत्री महोदय, पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पोलीसांवरील हल्ला ही अतिशय गंभीर बाब आहे. याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण द्यावेत. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.