लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने तुतारी फुंकायला सुरुवात केलीय. महायुती सरकाराल धारेवर धरण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे बारामतीत सभा घेऊन तोफ डागत आहेत. सुप्रिया सुळे यांनी जनतेला संबोधीत करताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. "माझ्या कामांबद्दल आणि भाषणाबाबत सर्वात जास्त टीका केली जाते. पण बारामतीकरांनी मला तिनदा निवडून दिलं आहे. २००७ आणि २००९ पर्यंत मी बारामती लोकसभेतील प्रत्येक वाडी, वस्ती फिरले आणि त्यानंतर मला तिकीट मिळालं. मी संसदेत चहा पिण्यासाठी नाही, तर बारामती मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेले", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे बारामतीत भाषण करताना म्हणाल्या, गेल्या दहा वर्षात महागाई, बेरोजगारी,भ्रष्टाचार,ह्या सर्व गोष्टी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु झाल्या आहेत. रोहित आणि मला दोघांनाही मंत्रीपदाची संधी होती. एकीकडे सत्ता आणि अदृश्य शक्ती, तर दुसरीकडे वडील, विचार आणि संघर्ष अशी परिस्थिती होती. रोहित पवारांना ईडीच्या माध्यमातून त्रास दिला गेला. ह्यांच्या विरोधात बोललं की ईडी लावली जाते. पक्षात आलं की वॉशिंग मशीनमध्ये घातलं जातं.अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही ? भाजप अशोक चव्हाण यांना भ्रष्टाचारी म्हणत होते.
अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का याचे उत्तर भाजपने द्यावं.अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं.आंदोलनकर्त्यांनादेखील जेलमध्ये टाकलं.आज तुमची तर उद्या आमची वेळ असेल, हे त्यांनी लक्षात ठेवावं.आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जातो.लोकशाहीत दडपशाही करणार असाल, तर हे चालणार नाही. पक्षाचं चिन्ह गेलं यासाठी रडायचं नाही. तुतारीवाला माणुस हे चिन्ह मिळालं, हे आपल्यासाठी शुभसंकेत आहेत. तुतारी वाला माणूस ही एक भ्रष्टाचाराच्या विरोधातली नांदी आहे.बारामतीकरांनी मला तीनवेळा संधी दिली. त्यामुळे या निवडणुकीत देखील मला 'तुतारी' या चिन्हाला साथ देऊन पुन्हा एकदा निवडून द्या.
बारामतीमध्ये धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. भारतातील सर्वात जास्त इंजिनियर हे हिंजवडीमध्ये काम करतात. हिंजवडीमध्ये पवार साहेबांनी आयटी पार्क सुरु केलं. बारामतीत पार पडलेल्या नमो रोजगार मेळाव्यात ४० हजार नोकऱ्या देण्याचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं होतं. पण फक्त दहा हजार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. राज्य सरकारने जर शब्द दिला होता, तर मग ३० हजार नोकऱ्या गेल्या कुठे? राज्य सरकारने फक्त गाजर दाखवण्याचं काम केलं आहे. ज्या कंपन्या महाराष्ट्रात येतात त्या कंपन्यांना दुसऱ्या राज्यात घालवण्याचे काम ट्रिपल इंजिन सरकार करीत आहेत.मेरिटमध्ये पास झालेला असताना देखील आमच्या युवकांचे रोजगार हातातून काढून घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही.
कांद्याची निर्यात बंदी सुरू करा एवढीच माझी मागणी होती.आणि यामुळेच माझं निलंबन केलं गेलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणे जर आमची चूक असेल तर आम्हाला फाशी द्या, तरी देखील आम्ही बोलणं सोडणार नाही. इपीएस ९५ काय आहे ? पेन्शनच्या पैशाबाबत कामगारांनी सावध राहावे. इपीएस ९५ चे पैसे कुठे गेले?यासाठी आम्ही अनेकदा लढलो. भाजपच्या खासदार हेमामालिनी यांनी देखील इपीएस (EPS) ९५ चे पैसे नागरिकांना द्या, अशी मागणी केली आहे. राज्यात एमआयडीसी वाढत नाही मात्र ती कमी होताना दिसून येत आहे. वीज एमआयडीसी,शाळा, हॉस्पिटल,औषधांच्या कंपन्या, अंगणवाड्या कोणी काढल्या ? हे सगळं काँग्रेसच्या माध्यमातून सुरु झालं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.