प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. टाटा समूहाकडून निधनाची बातमी देण्यात आली. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे.
सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या की, टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वास आणि औदार्याचे प्रतिक होते.
आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाची मूल्ये कायम राखली.त्यांच्या निधनामुळे समाजाप्रती आपले उत्तरदायित्व मानणारा उमद्या मनाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.