विनोद गायकवाड, दौंड: 'काळाचा प्रवाह कधी कुणासाठी थांबत नाही', असे सांगत दौंड तालुक्यातील नानविज गावात एसटी बस सुरू झाली तेव्हाचा एक जुना फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्या मुलीसोबत त्यांनी त्यावेळी फोटो काढला होता, त्याच मुलीसोबत आज पुन्हा काढलेला फोटो सोबत असून त्यासाठी लिहिलेल्या भावनिक पोस्टला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
याबाबत ट्विट करताना त्या म्हणतात 'काळाचा प्रवाह कधी कुणासाठी थांबत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील नानविज, ता. दौंड येथे गावभेट दौऱ्यात जुन्या आठवणींना उजाळा देणारी घटना आज घडली. खालील फोटोत एका चिमुकलीला एसटी बसमध्ये चढवित असतानाचा हा फोटो... हा केवळ फोटो नाही तर एका मोठ्या संक्रमणाची कहाणी आहे. या चिमुरडीचं नाव अंकिता पंढरीनाथ पाटोळे. हा फोटो आम्ही बारा वर्षांपूर्वी काढला तेंव्हा तिच्या नानविज गावात दौंड पर्यंत जाणारी बस सुरु झाली होती'.
नव्यानेच गावात आलेल्या एसटी बसमध्ये बसून शाळेला निघालेल्या त्या मुलीविषयी सुळे यांनी लिहिलंय, 'पाठिवर दप्तर घेऊन अंकिता तेंव्हापासून दररोज शाळेत जात होती. आज पुन्हा ती भेटली. सध्या ती बारावीला आहे. तिच्या डोळ्यांत इंजिनिअर होण्याचं स्वप्न होतं. ही अतिशय कौतुकाची बाब आहे. हे स्वप्न पाहण्याची आणि ते पुर्ण करण्याची ताकद तिला शिक्षणाने दिली. ही एकट्या अंकिताची कहाणी नाही, तर या बसने प्रवास करणाऱ्या शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींनी काही स्वप्ने पाहिली आणि ती पुर्ण केली आहेत. या गावात बस सुरु करणे ही तशी छोटीच गोष्ट होती पण अनेकांच्या आयुष्यात या कामामुळे प्रकाश पडला ही समाधानाची बाब आहे'.