नांदेडमध्ये 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे यात नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांमध्ये झालेले मृत्यू हे नैसर्गिक नसून महाराष्ट्रातील ट्रिपल इंजीन सरकार निष्पाप रुग्णांचे खुनी आहेत, असा गंभीर आरोप केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा भासत आहे. या तुटवड्याचे खापर हाफकीनवर फोडले जात आहे. मुळात या सर्व प्रकाराला हाफकीन जबाबदार नसून राज्य सरकार व आरोग्य विभाग कारणीभूत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांचे हात रुग्णांच्या खुनाने रंगले आहेत, अशी घणाघाती टीका खासदार सुळे यांनी केली आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे. सरकार मनुष्यबळ देत नसेल तर अशा प्रकाराला हाफकीन जबाबदार आहे, असं कसं म्हणता येईल, असा सवालही त्यांनी केला. राज्यातील ट्रिपल इंजीन सरकार केवळ आपला खिसा भरण्यात व्यस्त आहे. निष्पाप रुग्णांचे बळी जात असल्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही, असे खासदार सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, सुप्रिया सुळे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज मंगळवारी (ता. ३) त्या अमरावतीत दाखल झाल्या. अमरावती शहरातील अंबादेवी व एकवीरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची संवाद साधला.