सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या कथित मद्यधोरण प्रकरणात केजरीवाल यांना सक्तवसुली सचंनालय (ईडी) कडून २१ मार्चला अटक करण्यात आली होती.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवालांना अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात निदर्शनेही केली होती. केजरीवाल यांना जामीन मिळावा, यासाठी आपच्या नेत्यांनी न्यायालयाकडे मागणीही केली होती. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.