आयपीएल २०२४ च्या १८ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा ६ विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हैदराबादनने सलग दुसऱ्या विजयावार शिक्कामोर्तब केलं. हैदराबादच्या विजयात अभिषेक शर्माचा सिंहाचा वाटा होता. खेळपट्टी धीम्या गतीची असतानाही अभिषेकने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी केली. अभिषेकने १२ चेंडूत ३७ धावांची वादळी खेळी केली. ज्यामध्ये तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. हैदराबादने सामना जिंकल्यानंतर अभिषेकला प्लेयर ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानीत करण्यात आलं.
अभिषेक शर्मा काय म्हणाला?
गोलंदाजी करत असताना आम्हाला वाटलं की, ही खेळपट्टी धीम्या गतीची आहे. त्यामुळे आम्ही पॉवर प्लेचा फायदा घेणार होतो. त्यानंतर आम्ही फलंदाजीची लय पकडून धावा करू, याबाबत आम्हाला विश्वास होता. आयपीएलआधी आमच्याकडे चांगली तयारी करण्याची संधी होती. आम्हाला माहित होतं की ही खेळपट्टी धीम्या गतीची असेल. गोलंदाजांवर आक्रमकपणे फटके मारले, तर गोलंदाजांची दमछाक होईल, हे आम्हाला माहित होतं.
सनरायजर्स हैदराबादचं होम ग्राऊंड राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना खेळवण्यात आला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ विकेट्स गमावून १६५ धावा केल्या. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी १६६ धावांचं आव्हान होतं. चेन्नईच्या फलंदाजीवेळी शेवटच्या सत्रात खेळपट्टी स्लो झाली होती. त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांना धावांचा सूर गवसला नाही. तसच हैदराबादच्या फलंदाजांसाठीही धावांचा पाठलाग करणं सोपं नव्हतं. परंतु, अभिषेक शर्माने कठीण परिस्थितीला हाताळलं आणि एसआरएससाठी पॉवर प्लेमध्ये ७८/१ अशी धावसंख्या रचली. त्यानंतर १९ व्या षटकात सामना खिशात घातला.