पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत भविष्यवाणी केली. एक दिवस असा येईल सचिन अहिर हे भारतीय जनता पक्षासोबत दिसतील असं मुनगंटीवार म्हणाले. एवढं नाही तर अनिल परबांची अवस्था महाभारतातल्या अश्वत्थामासारखी नाही झाली, तर माझं नाव बदला असं देखिल ते म्हणाले आहेत.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आमच्या पक्षामध्ये त्याग, तपस्या, बलिदान... यही भाजप की पहचान, परिवारही मेरी पहचान, असं भाजप काम करत नाही. 105 आमदार सध्या त्यागच करतायत असं मुनगंटीवारांना रोखत सचिन अहिर यांनी म्हटलं. यावर सचिन अहिर यांना प्रत्युत्तर देतना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सचिनभाऊ... सचिनभाऊ... मी आज एक भविष्यवाणी करतो. एक दिवस सचिन अहिरसुद्धा भाजपसोबत असतील. मी गंमत नाही करत, मी गांभीर्यानं सांगतोय.
अनिल परबांची अवस्था महाभारतातल्या अश्वत्थामासारखी नाही झाली, तर माझं नाव बदला, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेना नेते अनिल परबांनाही टोला लगावला आहे. तसेच पुढे बोलताना नियम न पाहता समोरच्याला बोलूच द्यायचं नाही, मग एकेदिवशी पक्ष मायक्रोस्कोपमध्ये पहावा लागतो, सुधीर मुनगंटीवारांनी अनिल परबांना टोला लगावला आहे.