अग्निपथ योजना आणि राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीवरून संतप्त झालेले काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय (Subodhkumar Sahay) यांनी केलेल्या एका वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जंतर-मंतरवरील 'सत्याग्रह' मंचावरून पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi) वादग्रस्त टीका करताना सुबोधकांत सहाय यांची जीभ घसरली आहे. झारखंडमधून आलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधान मोदींची हिटलरशी (Adolf Hitler) तुलना केली. त्यानंतर ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हिटलरच्या मार्गावर चालले आहेत, त्यांचा मृत्यूसुद्धा हिटलर सारखाच होईल. अग्निपथ योजनेवर माजी केंद्रीय मंत्री म्हणाले, "मला वाटतं की मोदींनी हिटलरचा सर्व इतिहास ओलांडला आहे. हिटलरनेही सैन्यात खाकी नावाची एक संघटना तयार केली होती. मोदींनी हे लक्षात ठेवावं की ते हिटलरच्या मार्गानं जात असतील, तर त्यांचा मृत्यू सुद्धा तसाच होईल"
केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आता यावरुन देशातील काही राज्यांत अग्नितांडव सुरु आहे. ही योजना मागे घेण्याची मागणी करण्यासाठी शेकडो लोकांनी गाड्या आणि रेल्वे स्थानकांची जाळपोळ आणि तोडफोड केली.'अग्निपथ' लष्करी भरती योजनेच्या विरोधात बिहारमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनांमुळे 200 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं की, शनिवारी 50 डबे आणि पाच लोकोमोटिव्ह पूर्णपणे जळून खाक झाले. दानापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक प्रभात कुमार म्हणाले की, प्लॅटफॉर्म, कॉम्प्युटर आणि इतर तांत्रिक उपकरणांचंही मोठं नुकसान झालं आहे.
'एफआयआर असलेल्या उमेदवारांना लष्करात स्थान नाही'
लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, शिस्त हा भारतीय लष्कराचा पाया आहे. त्यात जाळपोळ, तोडफोड कऱ्यांना स्थान नाही. प्रत्येकाला दंगलीचा आपण भाग नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. पोलिस पडताळणी 100% आहे, त्याशिवाय कोणीही सामील होऊ शकत नाही. लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, सशस्त्र दलांसाठी शिस्त ही मूलभूत गरज आहे. कोणत्याही उमेदवाराविरुद्ध एफआयआर असल्यास ते त्यात सहभागी होऊ शकत नाहीत. डीएमएचे अतिरिक्त सचिव, लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, 'अग्नवीर'ला सियाचीन आणि इतर भागात समान भत्ता मिळेल जो सध्या कार्यरत असलेल्या नियमित सैनिकांना लागू आहे. त्यांच्याशी सेवेच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही.