मुंबई : शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (MSRTC Strike) आंदोलन सुरु केलं आहे. मुंबईतील सिल्व्हर (Silver Oak) ओक या शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. अचानक याठिकाणी हे कर्मचारी आल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांनाही आंदोलकांना आवरणं कठीण झालेलं दिसलं. यावेळी पोलीस आणि कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात झटापट देखील पाहायला मिळाली. त्यामुळे आता या ठिकाणी संघर्ष निर्माण झाला आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना गावदेवी पोलीस स्थानकात नेलं. त्यानंतर जयश्री पाटील या स्वत: पोलीस स्थानकात गेल्या आहेत. आपल्या पतीला अडकवण्याचा प्रयत्न होत असून, शरद पवार त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. मुंबईतील गावदेवी पोलीस स्थानकात गुणरत्न सदावर्ते यांना आणण्यात आलं आहे.
शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या घटनेनंतर पोलीसांनी कारवाईला सुरुवात केली असून, 107 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून, त्यांच्या गुन्हे दाखल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना लगेचच वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले असल्याची देखील माहिती मिळतेय.
ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
शरद पवार यांनी आम्हाला शांततेचं आवाहन केलं आहे. हा हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर झालेल्या हल्ला असून, शरद पवारांच्या पत्नी आणि नात घरात असताना हा हल्ला झाला असल्याने हा काळा दिवस असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या गोंधळानंतर आता सिल्व्हर ओकवर सर्व नेत्यांनी धाव घेतली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते त्याठिकाणी उपस्थित आहेत. तसंच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बडे पोलीस अधिकारी देखील तिथे उपस्थित झाले आहेत.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकाराबद्दल बोलताना सांगितलं की, एसटी कामगारांच्या प्रश्नांच्या आडून, राज्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यातील काही पक्ष आणि काही अज्ञात शक्तींचा हात असू शकतो असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
हा सर्व प्रकार दुर्दैवी असून, यामागे कुणाचा तरी हात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे संसदीय लोकशाही माणनारे नेते आहेत. आज झालेलं आंदोलन पाहिलं, सुप्रिया सुळे तिथे निर्भीडपणे गेल्या, हात जोडून आंदोलकांना बोलत होत्या हे लोकशाहीला शोभनीय नाही असं संजय राऊत म्हणाले.
आंदोलकांनी गोंधळ सुरु केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे स्वत: घराबाहेर आल्या. यावेळी त्यांनी आंदोलकांना शांततेत चर्चा करण्याचं आवाहन केलं, मात्र चर्चा करण्यास तयार नसलेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी सुरु ठेवली. त्यानंतर पोलिसांनी आता आंदोलकांना ताब्यात घेतलं असून, वरीष्ठ पोलीस अधिकारी त्याठिकाणी दाखल झाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर काल उच्च न्यायालयानं काल निकाल दिला होता. कर्मचाऱ्यांना ग्रुच्युटी, सातवा वेतन आयोग आणि निवृत्ती वेतनाच्या निकालानंतर कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. मात्र त्यानंतर आता आज आंदोलक अचानक एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या घराबाहेर आले आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे.