राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणार्या दहावी बोर्डाच्या परीक्षेला आज गुरुवारपासून सुरुवात होत आहे. राज्यातील एकूण 15 लाख 77,256 विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. ही परीक्षा 533 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेला यंदा 61 हजार 708 इतके कमी विद्यार्थी बसले आहेत. ही परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित असेल. राज्यात यंदा कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बारावीप्रमाणेच दहावीला वाढीव 10 मिनिटे मिळतील. पालक आणि विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांतील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. मंडळाने प्रसिद्ध केलेले अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावे. दहावीच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर नेताना जीपीएस ट्रॅकिंग केले जाईल. प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करतानाही चित्रीकरण करण्यात येईल. गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला जाईल. भरारी आणि बैठी पथके परीक्षा केंद्रांवर असतील.
प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत दिलगिरी
बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकांबाबत मंडळ दिलगीर आहे. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी यापुढे दक्षता घेतली जाईल, असे शरद गोसावी यांनी यावेळी स्पष्ट केले.