आयपीएलच्या १७ व्या हंगामातील तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या अतितटीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. आंद्रे रसलने धावांचा पाऊस पाडल्यानं कोलकाताच्या संघाला २०८ धावांपर्यंत मजल मारता आली. रसलने आक्रमक फलंदाजी करून २५ चेंडूत ६४ धावांची वादळी खेळी केली. रसलच्या या खेळीत ३ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. परंतु, या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबाद संघानेही जशाच तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण अखेरच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची आवश्यकता असताना हर्षल राणेनं अचूक चेंडू टाकला अन् हैदराबादला विजय मिळवून दिला. त्यानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला पॅट कमिन्स ?
"शेवटच्या क्षणी चुरशीचा सामना झाला होता. या क्रिकेटच्या सामन्यात आम्हाला यश मिळालं नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे. आम्ही ज्या प्रकारे गोलंदाजी केली, त्याबाबत मला आनंद वाटला होता. परंतु, आंद्रे रसलने नेहमीप्रमाणे शेवटच्या सत्रात आक्रमक फलंदाजी केली. त्याला रोखणं खूप कठीण आहे. सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली, असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या योजना बनवता. सामन्यात जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करता.
परंतु, रसलला गोलंदाजी करणं खूप कठीण आहे. काही चेंडू आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीनं फेकू शकलो असतो. आमच्या संघासाठी हेनरिक क्लासेननं चमकदार कामगिरी केली. शाहबाजनंही मोलाचं योगदान दिलं. आम्हाला वाटलं नाही की, टार्गेटच्या इतक्या जवळ आम्ही पोहचू. आम्ही त्यांच्या घरेलू मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला चांगलं आव्हान दिलं. नाणेफेक ज्या प्रकारे झाली, त्याचा आनंद आहे."