प्रशांत जव्हेरी | नंदुरबार : एसटी बसमधून (ST Bus) गांजा तस्करीचा (Ganja Smuggling) धक्कादायक प्रकार बस वाहकाच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. बसमध्ये 8 किलो गांजा जप्त करण्यात आला असून याची किंमत जवळपास 80 हजार असल्याचे समजत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या नावे तक्रार नोंद केली आहे. दरम्यान, बस वाहकाच्या सतर्कतेचे सर्वच स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरपूर-सुरत ही एसटी बस नंदुरबार-नवापूर या दरम्यान आली असता गांजाची बॅग एका सीटखाली आढळून आली. वाहकाने तातडीने सदर बॅग नवापूर बस स्थानकावरील वाहतूक निरीक्षक सचिन पाटील यांच्याकडे जमा केली. तर, बसमधील प्रवाशांना दुसर्या बसने रवाना करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांना दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली असून पंचनामा केला. त्यात बसमधील आठ किलो वजनाचा सुका गांजा जप्त करण्यात आला. याची किंमत ८० हजार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांनी दिली. नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईदरम्यान बसस्थानकावर मोठी गर्दी झाली होती. बसमध्ये अशा पद्धतीने गांजा तस्करी सुरू असल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. हे गांजा तस्करीचे आंतरराज्य रॅकेट तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत पोलिस कसून चौकशी करीत आहे.