आयपीएलच्या १७ व्या हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने धडाकेबाज फलंदाजी करून ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीनं ५२ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. तसंच रियान परागच्या ४३ धावांच्या जोरावर राजस्थानने २० षटकात चार विकेट्स गमावून १९३ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्सने या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, लखनऊ संघाला २० षटकांत ६ विकेट्स गमावून १७३ धावाच करता आल्या. त्यामुळे राजस्थानचा या सामन्यात दणदणीत विजय झाला.
क्विंटन डिकॉक बाद झाल्यानंतर लखनऊचा कर्णधार के एल राहुलने सावध खेळी करून अर्धशतक ठोकलं. राहुलने ४४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं ५८ धावा केल्या. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर राहुल बाद झाल्यानंतर देवदत्त पड्डीकल, आयुष बदोनी स्वस्तात माघारी परतले. दिपक हुड्डाने २६ धावा करून संघाची धावसंख्या वाढवली.
परंतु, चहलच्या गोलंदाजीवर तो बाद झाल्यावर निकोलस पुरनने धावांचा पाऊस पाडला. पुरनने ४ चौकार आणि ४ षटकार ठोकून ४१ चेंडूत नाबाद ६४ धावा कुटल्या. पुरनच्या आक्रमक खेळीनं लखनऊच्या धावसंख्येचा वेग वाढला. पण लखनऊला राजस्थानवर विजय मिळवता आला नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात विजयी सलामी ठोकली.