नव्वदीच्या दशकातील भारतीयांच्या जीवनातला अविभाज्य भाग झालेल्या गायक के.के. यांचं ३१ मे रोजी कलकत्त्यामध्ये निधन झालं. के. के. कलकत्त्यामध्ये परफॉर्म करण्यासाठी गेले होते. त्यानंतर 2 दिवसांनी ते परतणार होते. मात्र कार्यक्रमानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. हॉटेलमध्ये त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. आता केकेच्या मृत्यूनंतर गायिका शुभलक्ष्मी डे हिने काही मोठे खुलासे केले आहेत. के.के.ला नझरूल स्टेजवर परफॉर्मन्स देण्यासाठी जायचं नव्हतं. तिथे उपस्थित असलेली गर्दी पाहून केके यांना त्यांच्या कारमधून बाहेर पडावंसं वाटलं नव्हतं.
केके गाडीतून उतरत नव्हते
शुभलक्ष्मी यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं की, सभागृहातील गर्दी पाहून केके यांना त्यांच्या कारमधून बाहेर पडावंसं वाटत नव्हतं. केकेच्या मैफिलीपूर्वी 31 मे रोजी शुभलक्ष्मीने नझरूल स्टेजवर सादरीकरण केलं. शुभलक्ष्मीचा दावा आहे की, केकेनं सभागृहातील गर्दी लक्षात घेतली आणि सुरुवातीला त्यांना मैफिलीला जायचं नव्हतं. त्यामुळे त्यांना कारमधून बाहेर पडायचं नव्हतं. के.के.च्या आधी दुपारी नझरूल मंचावर सादरीकरण केलेल्या शुभलक्ष्मी म्हणाल्या, 'केके आले तेव्हा सभागृहाबाहेर मोठी गर्दी होती. 5.30 च्या सुमारास केके आले. तिथून गर्दी हटवली नाही तर गाडीतून बाहेर पडणार नाही, असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं.
के. के. परफॉर्मंन्स करण्यापूर्वी ठणठणीत होते
शुभलक्ष्मी यांनी पुढे सांगितलं की, ग्रीन रूममध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. पण मी होते त्यावेळी के. के. माझ्याशी काही मिनिटं बोलले. त्यावेळी ते पूर्णपणे बरे होते. मीही त्याच्यासोबत सेल्फी काढला.