पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची पुणे महापालिकेकडून ‘ऐतिहासिक वारसा स्थळ’ म्हणून घोषणा करण्यात आली आहे. याचबरोबर महापालिकेच्या हेरीटेज वॉकमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश करण्यात आला आहे.
ब्रिटीश राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि त्यासाठी सर्व जाती धर्मांना एकत्र आणण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मांडली होती. त्यानुसार पुण्यात 1892 मध्ये रंगारी यांनी तीन गणपती बसवले. त्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश होता. पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन हे या गणपती ट्रस्टचे विद्यमान उत्सव प्रमुख आणि विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे उत्सवप्रमुख पदाची जबाबदारी आल्यापासून दरवर्षी ट्रस्टच्या माध्यमातून गणेशोत्सवात विविध उपक्रम राबविले जात आहेत. देश-विदेशातून रंगारी गणपतीच्या दर्शनासाठी येतात. मात्र, असे असतानाही महापालिकेच्या ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश नव्हता. पुनीत बालन यांनी त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर आता रंगारी गणपतीची ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील प्रसिध्द ऐतिहासिक वास्तुंची पर्यटकांना पाहणीसाठी करता यावी यासाठी महापालिकेने जो 'हॅरिटेज वॉक' केला आहे, त्यामध्येही रंगारी गणपतीचा समावेश करण्यात आला आहे. या हेरीटेज वॉकमध्ये मध्य पुण्यातील बारा ऐतिहासिक वास्तुंचा समावेश आहे.
रंगारी भवन पर्यटकांचे आकर्षण केंद्र
क्रांतिकारकांचे माहेरघर असलेल्या रंगारी भवनात गुप्तदालन, भुयारी रस्ते, ब्रिटिशकालीन ऐतिहासिक शास्त्रास्त्रे, इस्ट इंडिया कंपनीची पेटी व वाड्याला सेंट्रल लॉकिंग सिस्टीम असून विश्वस्त पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पुनीत बालन यांनी 'इंद्राणी बालन फाऊंडेशन'च्या माध्यमातून रंगारी भवनाचे नूतनीकरण केले. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचे हे भवन आकर्षण केंद्र बनले आहे.
पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त म्हणालेत की, "देशाच्या स्वातंत्र्य लढयात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपतीचे मोठे योगदान आहे. ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीत महापालिकेकडून या गणपतीचा समावेश केला याचा उत्सवप्रमुख आणि एक गणेशभक्त म्हणून मनस्वी आनंद होत आहे. या पुढील काळात या ट्रस्टच्या माध्यमातून गणेशोत्सवाचे वैभव वाढविण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न करू"