वॉशिंग्टन : अमेरिकेत शिकागो येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त पार पडलेल्या परेडवर एका तरुणाने अंदाधुंद गोळीबार केला आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती लेक काउंटी शेरीफ कार्यालयाने ही माहिती दिली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण होते. याप्रकरणी २२ वर्षीय रॉबर्ट क्रिमो याला अटक केली आहे.
शिकागो येथे 4 जुलै रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त परेड आयोजित करण्यात आली होती. परंतु, परेड सुरू झाल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनी गोळीबार सुरू झाला. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. शेकडो लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले होते. यानंतर आरोपी रॉबर्ट स्वतः हात वर करत पोलिसांना शरण आला. त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, अमेरिकेतील बहुप्रतीक्षित बंदूक हिंसाचार प्रतिबंधक विधेयकावर अध्यक्ष जो बायडेन यांनी २६ जूनला स्वाक्षरी केली. अमेरिकेत बेछुट गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याला प्रतिबंध घालण्यासाठी वैधानिक तरतूद करण्याच्या मागणीचा दबाव सरकारवर वाढला होता